‘पुरस्कार वापसी गॅंगच्या डोळ्यात सलतो तो नव्याने स्तंभ उभारणारा सिंह’

शिवराय कुळकर्णी  – या देशातील डावे, लिबरल, सेक्युलर, माओवादी, हिंदुत्व विरोधक, पुरोगामी आणि बुद्धिजीवी यांना आता नव्या निर्माणाधिन संसद भवनावरील स्तंभावर आक्षेप आहे. सारनाथच्या मूळ अशोक स्तंभावरील सिंह शांत, संयमी, मवाळ आहेत आणि या नव्या स्तंभावरचे सिंह रागीट, आक्रमक असल्याचे कारण पुढे करून हा कंपू बोंबलत सुटला आहे. पुरस्कार वापसी गॅंग मंडळी यात आघाडीवर आहे. मुळात सारनाथच्या मूळ अशोक स्तंभात आणि यात साधर्म्य आहे. पण ते या कंपूला दिसत नाही. दिसले, उमगले तरी त्यांचे मन मानत नाही.

महाभारतातील एक कथा मी ऐकली होती. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडव दोघांचेही गुरू होते. विद्यार्थी दशेत सर्व एकत्रच शिक्षण घेत होते. त्यामुळे गुरूंना सर्वांच्या स्वभावाची ओळख झाली होती. स्वभावाची व दृष्टीकोनाची चाचणी घेण्यासाठी गुरू द्रोणाचार्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी युधिष्ठिर आणि दुर्योधन दोघांनाही बोलवले आणि सांगितले, तुम्हाला 3 दिवसांचा अवधी दिला आहे. या तीन दिवसात युधिष्ठिराने हस्तिनापुरातील वाईट माणसांचा शोध घेऊन त्यांची यादी सादर करायची आणि दुर्योधनाने हस्तिनापुरातील चांगल्या सज्जन लोकांची भेट घेऊन यादी तयार करायची. चाचणीचे तीन दिवस संपले. दोघेही गुरूंजवळ रिकाम्या हाताने परतले. गुरुंच्या विचारणेनंतर युधिष्ठिर म्हणाला, गुरुजी हस्तिनापुरात मला एकही वाईट माणूस भेटला नाही. प्रत्येकात काही ना काही चांगुलपणा होताच. तसेच दुर्योधनाला एकही सज्जन, चांगला माणूस भेटला नाही. त्यास प्रत्येकात काही ना काही वाईट आढळून आले. या प्रयोगावर गुरू द्रोणाचार्यांनी भाष्य केले, जशी ज्याची दृष्टी तशी त्याची सृष्टी ! हा आहे दृष्टीचा फरक. युधिष्ठिरासाठी सगळे जग सज्जन तर दुर्योधनासाठी सगळ्या जगात फक्त दुर्जन भरलेले.

हे उदाहरण पुरस्कार वापसी गॅंग साठी तंतोतंत लागू पडते. जशी तुमची दृष्टी, तशी तुमची सृष्टी ! यांना स्तंभावरच्या सिंहांशी काहीच देणेघेणे नाही. यांच्या डोळ्यात सलतो तो नव्याने स्तंभ उभारणारा सिंह ! या सिंहाला ते अजूनही समजूच शकलेले नाही. दुर्योधनात आणि यांच्या दृष्टीत साम्य असले तरी एक मोठा फरक आहे. दुर्योधन किमान प्रामाणिक होता. आपल्याला जे दिसते ते सांगायचा प्रामाणिकपणा त्याच्याजवळ होता. हे नंबर एक बेईमान आहेत. दांभिक, ढोंगी आहेत. पंतप्रधान देहूत पहिल्यांदा आले तर सारे वारकरी, सारा महाराष्ट्र सुखावला. यांचा मात्र पोटशूळ उफाळला. मोदींची प्रत्येक कृती यांची मूळव्याध उमळून आणणारी ठरते. या कंपूच्या मते नव्या स्तंभावरचे सिंह रागीट आणि आक्रमक आहेत. हो ! डाव्यांनो, माओवाद्यांनो, पुरोगाम्यांनो, कंपूवाल्यांनो नव्या भारताचा सिंह स्वाभिमानी आहे. आम्हाला तो तसाच हवा आहे. युद्धात देश जिंकल्यावर टेबलावर तह करून हारणारा नको. दुश्मनाच्या छाताडावर जाऊन सर्जिकल स्ट्राईक करणारा सिंह आम्हाला हवा. शेपूट आत घालून शांतीच्या पुळचट वार्ता करणारा नको. दुर्बलांच्या शांतीला कोणी भीक घालत नाही.

नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने। विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता !! या देशाला स्वयमेव मृगेंद्रता वर विश्वास आहे. भारताचेच खाऊन भारताला क्षीण करण्याचे तुमचे मनसुबे पूर्ण होण्याचे दिवस संपले. तुमच्या नरेटिव्हला सामान्य जनता भीक घालत नाही. कारण त्यांना गगनभेदी गर्जना देणारा सिंह मिळाला आहे. या देशाच्या जनतेने बहुमताने व लोकशाही मार्गाने या सिंहाला राज्याभिषेक केला आहे. तुम्ही टिकल्या फोडत राहा तो अत्याधुनिक तोफ डागायला सज्ज आहे. मूळ अशोक स्तंभावरचा सिंह आणि नवा सिंह सारखाच आहे. पण कोणाला हा सिंह आक्रमक वाटत असेल तर आम्हाला तसाच सिंह हवा आहे ! मोदीजी… आगे बढो !!