GameOver: भारतीय संघ निवडकर्ते चेतन शर्मांची होणार हकालपट्टी? बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये

भारतीय संघाचे मुख्य संघ निवडकर्ता चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी एका न्यूज चॅनलद्वारे केल्या गेलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आतल्या गोटातील माहिती सार्वजनिक केली आहे. यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे. या स्टींग ऑपरेशनमध्ये (Chetan Sharma Sting Operation) चेतन शर्मा यांनी भारतीय खेळाडूंबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

रोहित शर्माची (Rohit Sharma) टी२० कारकिर्द, जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) दुखापत आणि संघ व्यवस्थापनातील मतभेद, विराट कोहली (Virat Kohli) आणि सौरव गांगुली यांच्यातील कर्णधारपदाचा विवाद, फिटनेससाठी खेळाडूंचे इंजेक्शन घेणे अशा अनेक विषयांबाबत त्यांनी खळबळजनक दावे केले आहेत. यानंतर चेतन शर्मा यांच्याविरोधात बीसीसीआय मोठी कारवाई करू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहे. कारण मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी अनेक वादग्रस्त दावे केले आहेत. याशिवाय, ते बोर्डाशी करारात आहेत आणि या करारानुसार त्यांना मीडियामध्ये कोणत्याही वैयक्तिक विषयावर चर्चा करण्याची परवानगी नाही.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “चेतन शर्मांचे भविष्य काय असेल याचा निर्णय बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांचा असेल. चेतन शर्मा यांनी अनेक वादग्रस्त आणि वैयक्तिक खुलासे केले आहेत. यानंतर प्रश्न असा आहे की, टी२० कर्णधार हार्दिक पांड्या किंवा वनडे-कसोटी कर्णधार रोहित शर्माला संघ निवडीच्या बैठकीत चेतन शर्मांसोबत बसायचे आहे का?”