सगळं संपलं! रोहितची टी20 कॅप्टन्सी आणि कारकिर्द दोन्हीही संपुष्टात, विश्रांतीच्या बहाण्याने बाहेर…

भारतीय संघाचे मुख्य संघ निवडकर्ता चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी एका न्यूज चॅनलद्वारे केल्या गेलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आतल्या गोटातील माहिती सार्वजनिक केली आहे. यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे. या स्टींग ऑपरेशनमध्ये (Chetan Sharma Sting) चेतन शर्मा यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या टी20 कारकिर्दिबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. याचबरोबर रोहित शर्माच्या टी20 कर्णधारपदाबाबत देखील मोठे वक्तव्य केले आहे.

चेतन शर्मांनी सांगितले की, रोहित शर्माला (Rohit Sharma) यापुढे टी20 संघात स्थान दिले जाणार नाही. त्याच्याकडून टी20 संघाचे नेतृत्त्वपदही काढून घेण्यात येईल आणि हार्दिक पंड्याला भावी टी20 कर्णधार बनवले जाईल. त्यांच्या या दाव्यानंतर रोहितची टी20 कारकिर्द (Rohit Sharma T20 Career) पूर्णपणे संपुष्टात येणार असल्याचे दिसते आहे.

ते म्हणाले की, “रोहित शर्माला विश्रांतीच्या नावाखाली बाजूला केले जाईल. तो टी20 संघाचा कर्णधार राहणार नाही, तर हार्दिक पांड्या ही जबाबदारी सांभाळेल.” मात्र, यात नवीन काही नाही, कारण याआधीही अशा गोष्टी माध्यमांतून समोर आल्या होत्या. मात्र चेतन शर्माच्या तोंडून अशा गोष्टी बाहेर येणे हा मोठा वाद निर्माण करू शकते, कारण ही गोपनीय बाब आहे.

रोहित शर्माची टी20 कारकिर्द संपल्यात जमा असल्याचे वृत्त यापूर्वी देखील माध्यमांमध्ये आले आहे. मात्र रोहितने सांगितले होते की तो अजूनही टी20 चा कर्णधार आहे. आता चेतन शर्मांच्या नव्या वक्तव्यामुळे रोहित शर्मा तोंडघशी पडला आहे.

विशेष म्हणजे काही दिवसातच ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या शेवटच्या दोन कसोटींसाठी भारतीय संघांची घोषणा अजून व्हायची आहे. त्यापूर्वीच हे स्टिंग ऑपरेशन आल्यामुळे आता बीसीसीआय याबाबत काय निर्णय घेते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. जर चेतन शर्मा पदावर राहिले तर ते रोहित शर्माला कसे फेस करणार? या प्रकरणावर बीसीसीआय कशी प्रतिक्रिया देते हेही उत्सुकतेचे ठरणार आहे.