पुण्यात मुळीक, टिळेकर, भेगडे आता विरोधकांचा प्रचार करणार; मनसेची टीका

Pune – शरद पवार (Sharad Pawar) सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल असं भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्टींकडून अजित पवारांना सांगण्यात आल्याचा दावा विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार (Opposition leader Vijay Vaddetiwar) यांनी केला आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना वड्डेटीवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) भाजपाच्या सांगण्यावरुन शरद पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही म्हटलं आहे.

2 प्रमुख पक्ष पडूनही भाजपाची परिस्थिती सुधारत नसल्यामुळे अजित दादा हे शरद पवार यांना भेटत आहे. लोकनेतृत्व असलेले शरद पवार यांची गरज भाजपाला आहे. त्यांची मदत मिळाल्याशिवाय लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही. त्यामुळे अजित दादाच्या शरद पवार यांना भेटत आहे, असं वड्डेटीवार म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना अट घातली आहे की शरद पवार आल्याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री होता येणार नाही. म्हणूनच अजितदादा मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांना वारंवार भेटून सोबत येण्यास आग्रह करत आहेत, असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.

याचसंदर्भात मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष आशिष देवधर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जे शिवसेनेने मविआ मध्ये केले तेच अजित पवारांनी महायुतीत केले. परस्पर विरोधी विचारांसोबत एकत्र येऊन सत्तेचा मलिदा चोपला आहे. आता खरी मजा जिथे राष्ट्रवादी वि भाजपा अशी लढत झाली होती तिथे येणार आहे. मुख्यता पुण्यात मुळीक, टिळेकर, भेगडे आता विरोधकांचा प्रचार करणार. एकंदरीत तंगड्यात तंगडं आहे.अशी टीका त्यांनी केली आहे.