भगतसिंह कोश्यारी पुन्हा भाजपात प्रवेश करणार? माजी राज्यपालांनी सांगितला पुढचा प्लॅन

मुंबई- भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपद सोडल्यानंतर रमेश बैस यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केल्याने कोश्यारींना टीकेचा सामना करावा लागला होता. परिणामी त्यांना कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राज्यपालपदावरुन पायउतार व्हावे लागले. यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत पुढचा प्लॅन सांगितला आहे.

आपल्या भविष्याबाबत बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “प्रत्येक छोटा-मोठा सदस्य हा भाजपासाठी (BJP) काम करतो. काही लोक सदस्य बनून भाजपासाठी काम करतात, काही सदस्य नसतानाही भाजपासाठी मोठे योगदान देतात. माझ्याबाबत सांगायचे झाले तर, मी महाराष्ट्राचा राज्यपाल होण्याआधीपासूनच शैक्षणिक क्षेत्रात काम करत होतो आणि पुढेही करत राहीन. त्यावेळीही जेव्हा गरज पडेल तेव्हा मी भाजपासाठी काम करायचो. जेव्हा त्यांना गरज होती, तेव्हा मी भाजपात आलो.”