छत्रपती संभाजीराजे यांची नांदेड जिल्ह्यातील किल्ले माहूरगडास भेट 

नांदेड – खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काल (दि. १६ जानेवारी) रोजी नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले माहूरगडास भेट दिली. याबाबत त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली असून या भेटी बाबत त्यांनी माहिती दिली आहे.

‘रामगड’ असे मूळ नाव असलेला हा किल्ला येथील श्री रेणुकामाता तीर्थक्षेत्रामुळे सर्वांस परिचित आहे. अठराव्या शतकात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. प्राचीन ऐतिहासिक महत्त्व लाभलेला हा किल्ला सध्या राज्य पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे.

या विभागामार्फत गडावर काही विकासकामे करण्यात आलेली आहेत, त्यामध्ये कोणत्याही शास्त्रोक्त पद्धतीचा वापर न करता थेट सिमेंटचा वापर करून कामे केल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली. तथापि, नेहमी लोकांचा राबता असणाऱ्या या किल्ल्याचे योग्य पद्धतीने जतन व संवर्धन होणे गरजेचे असल्याचे सांगत, स्थानिकांच्या सहकार्यातून ‘फोर्ट फेडरेशन’च्या वतीने या किल्ल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने काम करण्याची इच्छा संभाजीराजे यांनी व्यक्त करत, लवकरच हे काम हाती घेऊ अशी ग्वाही दिली.