भावना गवळी जशा मोदींच्या दीदी झाल्या तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची दीदी व्हावं – अंधारे

Pune – पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश करून पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली होती. राठोड यांच्या विरोधातील लढा कायम राहिल असे विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले होते. आता राठोड यांचा विषय संपवूया, राज्यात अनेक प्रश्न आहेत असे वक्तव्य वाघ यांनी केले आहे.

यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. "भावना गवळी जशा मोदींच्या दीदी झाल्या तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची दीदी व्हावं" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच संजय राठोड यांची माफी मागावी असंही म्हटलं आहे.

कधी आंदोलन करायचं, कधी थांबवायचं हे राजकीय हेतू पुरस्कृत असतं. पूजा चव्हाणसारख्या मुलीला न्याय देण्यासाठी नसतं. चित्रा वाघ यांनी विषय संपवला कसा?, क्लीन चिट कोणत्या आधारे दिली? त्यामुळे मला वाटतं त्यांनी संजय राठोड यांची माफी मागितली पाहिजे. जशा आमच्या भावना गवळी मोदींच्या दीदी झाल्या तसं आता चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची दीदी व्हायला हरकत नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.