सार्वजनिक आयुष्यात लाज कोळून प्यायलेल्या या लोकांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे- चित्रा वाघ

Rajan Patil : सध्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Bhima Co-operative Sugar Factory Election) लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) असा सामना होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारात धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राजन पाटील यांनी सभ्यतेची सर्व मर्यादा ओलांडली आहे. पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच पोरं तुझ्याएवढी बाळं असल्याचे वादग्रस्त वक्तव्य राजन पाटील यांनी केलं आहे.

मोहोळ तालुक्यात एका सभेत भाषण करताना राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली आहे. ‘विरोधक आमच्या पोरांना बाळ म्हणत्यात… यांना माहिती आहे का पाटलांच्या पोरांना लग्नाआधी तुमच्या एवढी बाळ असत्यात,’ असे वादग्रस्त विधान राजन पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

अशातच भाजपा महिला संघटनेच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही या वक्तव्यावरून राजन पाटील यांचा समाचार घेतला आहे. राजन पाटलांवर टीका करताना चित्रा वाघ यांनी लिहिले की, ‘अशा छछोर वक्तव्यावर जीभ घसरली एवढीच टीप्पणी म्हणजे खूनाच्या गुन्ह्याची अदखलपात्र तक्रार नोंदवून बोळवण करण्यासारखे आहे. सार्वजनिक आयुष्यात लाज कोळून प्यायलेल्या या लोकांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे.’

‘आता महिलासन्मानाची माती करणाऱ्यावर सुप्रिया सुळेंची व त्यांच्या पक्षाची भुमिका काय?’, असा सवालही आपल्या ट्वीटद्वारे चित्रा वाघ यांनी केला आहे.