मराठी आणि गुजराती हे दोघेही दुधात साखरेसारखे एकमेकांत व मुंबईत विरघळून गेले आहेत – ठाकरे

मुंबई : मुंबईत मराठी व गुजराती हे दुधात साखरेसारखे विरघळून गेले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्राचे हे नाते अधिकधिक दृढ व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केली. मुंबई समाचार या वृत्तपत्राला २०० वर्षे झाल्यानिमित्त स्मृती टपालसंग्रहाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

ते म्हणाले, मला गुजराती कळते पण बोलता येत नाही. १८२२ पासून सुरू झालेले मुंबई समाचार जगातील आणि देशातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. मला अभिमान आहे या महाराष्ट्रात एक गुजराती वृत्तपत्र २०० वर्षे पूर्ण करत आहे. हेच तर आपले प्रेम आहे. मराठी आणि गुजराती हे दोघेही दुधात साखरेसारखे एकमेकांत व मुंबईत विरघळून गेले आहेत.

मुंबई समाचारने या सगळय़ा ऐतिहासिक घटनांचा आणि पारतंत्र्यातील स्वातंत्र्य लढय़ाच्या त्या वेळच्या बातम्या आणि छायाचित्रांचा संग्रह जतन करावा. मीदेखील वृत्तपत्र चालवतो. वृत्तपत्र चालवणे कठीण असते. वृत्तपत्र कोण कुठे चुकते याचा आरसा दाखवतात. पत्रकारांचे ते कर्तव्य असते. मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे.असं देखील ते म्हणाले.