‘शिवसेनेची दयनीय अवस्था अनेकांना बघवणार नाही पण सरकार बरखास्त केले तरी प्रश्न सुटणार नाही’

Pune – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ सोबतच ७ अपक्ष अशा एकुण ४१ आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. शिंदे यांनी दिलेल्या दणक्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे महाविकास आघाडीला पाठींबा देणारे अनेक अपक्ष सुद्धा आता भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेऊ लागले आहेत.

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, भाजप ला शिवसेना नकोच होती. एकच हिंदुत्ववादी राजकीय पक्ष असे त्यांना हवे आहे. मनसे ला सुद्धा शिवसेना नको आहे. राष्ट्रवादीला सुद्धा शिवसेनेचे अस्तित्व अडचणीचे वाटत होते. काँग्रेस नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेत आहेत

भाजप, मनसे, राष्ट्रवादी यांना शिवसेना तोडायची होतीच. शिवसेनेची दयनीय अवस्था अनेकांना बघवणार नाही पण सरकार बरखास्त केले तरी प्रश्न सुटणार नाही. नागरिकांनी, मतदारांनी काय धडा घ्यायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. असं सरोदे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.