बंजारा समाजाच्या विकासासाठी वचनबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲड. पंडित राठोड यांच्यासह बंजारा समाजातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

Devendra Fadanvis : बंजारा समाजाच्या विकासासाठी आम्ही वचनबद्ध असून या समाजाच्या विकासासाठी सरकार सर्वतोपरी मदत करून समाजाच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. गोर बंजारा तीर्थक्षेत्र बारा धामचे निर्माते ॲड. पंडित राठोड यांच्या भाजपा प्रवेश कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, भाजपा प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, नवनाथ पडळकर आदी यावेळी उपस्थित होते. बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.पी.टी.चव्हाण, गोद्री कुंभमेळा संयोजक व धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधात कार्य करणारे डॉ.मोहन चव्हाण, मेनकाताई राठोड, सुमित राठोड यांच्यासह या समाजाचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच बंजारा समाजाला न्याय देऊ शकते असा विश्वास या समाजाला आहे. म्हणूनच राष्ट्रीय स्तरावर बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असणारे कार्यकर्ते मुख्य राजकीय प्रवाहात सामील झाले आहेत. या समाजातील युवकांना रोजगार देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. वसंतराव नाईक विकास महामंडळाला निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही ते म्हणाले.

मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांचा अनेकांना लाभ होत असून विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते भाजपामध्ये येण्यास इच्छुक आहेत असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगीतले. ॲड. राठोड भाजपामध्ये दाखल झाल्यामुळे पक्ष आणखी मजबूत होईल आणि भाजपाच्या साथीने बंजारा समाज नवी उंची गाठेल असेही श्री.बावनकुळे यांनी सांगितले.