लासलगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करा – छगन भुजबळ

लासलगाव :- लासलगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव पोलीस स्टेशनची नूतन इमारतीस मंजुरी मिळाली असून या इमारतीचे काम सुरु आहे. आज लासलगाव दौऱ्यावर असतांना छगन भुजबळ यांनी या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना ही कामे जलद गतीने पूर्ण करण्याचा सूचना दिल्या.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, सरपंच जयदत्त होळकर, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पांडुरंग राऊत, डॉ.श्रीकांत आवारे, मंगेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

लासलगाव पोलीस स्टेशनची इमारत अतिशय जीर्ण झाल्याने या इमारतीमध्ये पोलीस यंत्रणेला कामकाज करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यादृष्टीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नवीन सुसज्य इमारती मंजूर करण्यात आली आहे. या इमारतींच्या बांधकामास सुरुवात झाली असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनसाठी सुसज्य इमारत निर्माण होऊन यंत्रणेला काम करणे अधिक सोयीचे होणार आहे.