राष्ट्रवादीच्या आमदाराने आपल्या तालुकाध्यक्षांना दिल्या चारचाकी गाड्या भेट !

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव जनमानसात अधिक बळकट करण्यासाठी पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा यांनी स्वखर्चातून जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना गाडी देण्याची संकल्पना अंमलात आणली आहे. आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात यापैकी दोन गाड्यांचे पूजन करून गाडीच्या चाव्या तालुकाध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आल्या.

यावेळी आमदार दौलत दरोडा, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार, युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे तसेच पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, तलसरा, जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड असे आठ तालुके आहेत. सुनील भुसारा हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे ते संचालक आहेत. दरम्यान, गुरूवारी भुसारा यांच्यासह राज्यातील पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांना अजित पवारांच्या हस्ते ओळखपत्र देण्यात आले. जयंत पाटील यांची ही संकल्पना आहे.