‘मोदींना पर्याय काय विचारता ? ही लोकशाही आहे, इथे कोणावाचून काहीच राहत नाही’

पुणे : ‘जगभरात नावलौकिक मिळवलेल्या भारतीय लोकशाहीला वाचवण्याची जबाबदारी आता सर्वसामान्य जनतेची आहे. लढण्याचा इतिहास हा आमच्यासाठी जुनाच असून, लोकशाही विरोधात कार्य करणाऱ्या लोकांविरोधात हा लढा कायमच सुरु राहील. काँग्रेसचे चरित्र हे देशाचे चरित्र आहे. एकाच बागेत अनेक फुले फुलवण्याची संस्कृती काँग्रेसची आहे. गांधींना मानणाऱ्यांनी देश वाचवण्यासाठी काँग्रेसमध्ये यावे, तर गांधींना मारणाऱ्यांचे समर्थन करणाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जावे,’ असे आवाहन काँग्रेसचे युवा नेते कन्हैयाकुमार यांनी केले.

अखिल भारतीय काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाच्या समारोपावेळी लोकशाही बचाव सभेत कन्हैय्या कुमार बोलत होते. काँग्रेस भवनच्या प्रांगणात झालेल्या सभेवेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे आदी उपस्थित होते.

कन्हैया कुमार म्हणाले, ‘काँग्रेसला माझी गरज नाही, तर मला काँग्रेसची गरज आहे. काँग्रेस जनमानसात रुजलेला देशव्यापी पक्ष आहे. देशाचा इतिहास खुप मनापासून वाचला, काँग्रेसचा विचार हाच खरा देशाचा विचार आहे. ज्यांना देश वाचवायचा असेल, त्यांनी काँग्रेस विचार अवलंबने गरजेचे आहे. ज्यांनी या देशात संस्था उभारल्या, पायाभूत सुविधा निर्माण केल्या, त्यांना त्याची किमंत असते. म्हणून काँग्रेस कायमच बीएसएनएल, रेल्वे, एअर इंडिया वाचविण्यासाठी अग्रभागी आहे. भाजपने देशाला काहीच दिलेले नाही, त्यामुळे ते केवळ या गोष्टी खासगीकरण करून विक्रीत काढत आहेत. देशाच्या नावाने देशातील उद्योजक मोठे करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत.’

‘विरोधी पक्षात राहुन सत्य बोलता येत नाही, हीच देशाची लोकशाही का? देशाच्या समस्यांचे निराकरण करणे हे देशाच्या सरकारचे काम आहे. मात्र देशातील समस्याकडे डोळेझाक करून मोदी सरकार केवळ त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही म्हणून पाहणे लोकशाही विरोधात आहे. मोदींना पर्याय काय विचारता? ही लोकशाही आहे, इथे कोणावाचून काहीच राहत नाही. सध्या संसदेत एकाही विषयावर चर्चा होत नाही. पंतप्रधानांना विरोध केला तर देशद्रोही कसे काय होते? असा प्रश्न कन्हैया कुमार यांनी यावेळी केला. मोदी कामापेक्षा जास्त अभिनय करतात. त्यामुळे त्यांना ऑस्कर मिळायला हवा, अशी टीकाही त्यांनी केली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘रोजगार, अन्न सुरक्षा, आरोग्य, शिक्षण आदींचा हक्क देण्याचे काम काँग्रेसच्या काळात झाले. सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या, समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. मात्र, अलीकडच्या काळात समूहाचे राजकारण होऊ लागल्याने लोकशाही धोक्यात येत आहे. त्यामुळे लोकशाही बचाव म्हणण्याची वेळ आली आहे. एकाधिकारशाही ही लोकशाहीसाठी घातक आहे. विरोधी पक्षातील लोकांची सोशल मीडियातून बदनामी करायची, सरकारी यंत्रणांचा वापर करून दबाव टाकायचा आणि खच्चीकरण करायचे, ही प्रथा गेल्या काही दिवसांत बळावली आहे. परिणामी, लोकशाही मूल्ये हरवत चालली असून, त्याचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणणे गरजेचे आहे. लोकशाही, भारतीय राज्यघटना वाचवण्याचे आपले कर्तव्य आहे. शेतकऱ्यांवर, त्यांच्या आंदोलनावर हल्ले करण्याचे काम ते करताहेत.’