‘या’ देशातील तरुणांना सिगारेट खरेदी करता येणार नाही, सरकार विक्रीवर बंदी घालणार

नवी दिल्ली- तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. पण, अनेक इशारे आणि सल्ले देऊनही लोक धूम्रपान आणि तंबाखू सेवन सोडत नाहीत. दरम्यान, न्यूझीलंड तंबाखू उद्योगावर जगातील सर्वात कठोर बंदी लादण्याची तयारी करत आहे. सरकारने असा युक्तिवाद केला की धूम्रपान कमी करण्यासाठी इतर प्रयत्नांना खूप वेळ लागत आहे. 2027 पासून या देशात 14 वर्षाखालील लोकांना कधीही सिगारेट खरेदी करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

तंबाखू विक्री आणि सर्व उत्पादनांमध्ये निकोटीनची पातळी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.न्यूझीलंडच्या सहयोगी आरोग्य मंत्री आयेशा वेराल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की,  आम्ही हे सुनिश्चित करू इच्छितो की तरुणांनी कधीही धूम्रपान करू नये. त्यामुळे आम्ही तरुणांच्या नवीन गटांना धूरविरहित तंबाखू उत्पादने विकणे किंवा त्यांचा पुरवठा करणे हा गुन्हा ठरवू.

सरकारच्या मते, गेल्या दशकात धूम्रपानाचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या, न्यूझीलंडमध्ये 18 वर्षाखालील लोकांना तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.सरकारी आकडेवारीनुसार, न्यूझीलंडमध्ये 15 वर्षांवरील 11.6 टक्के लोक धूम्रपान करतात. 2022 च्या अखेरीस कायदा बनवण्यासाठी सरकार पुढील वर्षी जूनमध्ये संसदेत कायदा सादर करणार आहे. तथापि, नवीन नियम पोलिसांच्या देखरेखीखाली असतील किंवा इतर देशांतून येथे येणाऱ्या लोकांवर ते कसे लागू होतील याची माहिती सरकारने अद्याप दिलेली नाही. 2024 पासून टप्प्याटप्प्याने हे निर्बंध लादण्यात येणार असल्याची माहिती आहे.