महाविकास आघाडीत मोठ्या फुटीची शक्यता; कॉंग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ? 

मुंबई – सत्तांतर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीत देखील धुसफूस सुरु झाली आहे. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Vidhan Parishad Opposition Leader) निवड झाली. परंतु महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसन (Congress) यावर आक्षेप घेतला आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर नाराजी व्यक्त केली. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाची निवड करताना महाविकास आघाडी म्हणून चर्चा होणं आवश्यक होतं. मात्र, तशी चर्चा करण्यात आली नाही. आम्हाला विचारात घेतलं गेलं नाही. निवड कुणाचीही होवो, पण चर्चा होणं गरजेचं होतं. त्यामुळे आमचा या निवडीला विरोध आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

मविआ नैसर्गिक आघाडी नाही, पुढच्या निवडणुका एकत्र लढायच्या की नाही कार्यकर्ते ठरवतील. अजितदादा आणि फडवीसांनी पहाटे शपथ घेतलेलं सरकार सरकार पडलं तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार सोनिया गांधीकडे गेले होते. त्यांनी प्रस्ताव ठेवला म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो. पण येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढवायच्या की नाही, याबाबत निर्णय कार्यकर्ते घेतील. आम्ही दोस्ती करतो पाठीवर वार नाही, असंही पटोले म्हणालेत.दरम्यान, पटोले यांच्या या वक्तव्यामुळे कॉंग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.