राज्यात ‘त्या’ ठिकाणीचं भारनियमन करण्याचा आमचा मानस – नितीन राऊत 

मुंबई – राज्यावर भीषण वीज संकटाचे (Power crisis) काळे ढग घोंघावत आहेत. अघोषित भारनियमनामुळे उद्योग बंद पडतील अशी स्थिती आहे. राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाच्या विषयाबाबत सत्ताधारी टोलवाटोलवी करत असल्याचे चित्र आहे. इतक्या मोठ्या वीज संकटात राज्याच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin raut)  बाजूने महाविकास आघाडीतील एका तरी मंत्र्याने उभे राहायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. इतकेच नव्हे तर राज्य महसूल मंत्रालयाने ऊर्जा मंत्रालयाचा मोठा निधी अडवून ठेवल्याने ऊर्जा मंत्रालय पूर्णतः एकाकी पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागात होणाऱ्या अघोषित भारनियमनाचा फटका थेट महागाईवर पडणार आहे. शेतीला पाणी न मिळाल्याने उभ्या पिकांचे नुकसान होणार असून, शेतकरी संकटात सापडला असल्याचे सध्या चित्र आहे.  भंडारा, गोंदिया गडचिरोलीत होणारे धानाचे पीक ऊर्जा मंत्रालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे संकटात येऊ शकते. इतकेच नव्हे तर गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रात वीज संकटाला कंटाळून तीन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, वेळीच मार्ग निघाला नाही तर ही संख्या वाढू शकते, अशी भीती  सुद्धा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर बोलताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भारनियमन कुठे होणार हे स्पष्ट केले आहे. ज्या ठिकाणी वीजेचे नुकसान आहे, वीज चोरी आहे, त्याठिकाणीचं भारनियमन करण्याचा आमचा मानस आहे, सामान्य नागरिकांना आम्ही भारनियमनचा त्रास देणार नाही, विजेचे बिल भरलेच पाहिजे, विजेची तूट भरुन काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, ग्राहकांनाही काटकसर करावी असे आवाहन उर्जामंत्र्यांनी जनतेला केले आहे.