‘नाकातून नळया घेऊन त्यांना…’; पर्रीकरांबाबत बोलताना कॉंग्रेस नेत्याने सोडली पातळी

पणजी – १४ फेब्रुवारी गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीतील प्रचारावेळी राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना देखील दिसून आले मात्र सध्या कॉंग्रेसचे जेष्ठ नेते फ्रान्सिस्को सार्दिन यांचा एक भाषण करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते टीकेचे धनी बनले आहेत.

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्याबाबत पातळी सोडून टीका करताना या व्हिडीओमध्ये ते दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणाची खिल्ली उडवत असून त्यांच्या मृत्यू बाबत देखील वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येत आहेत.

सार्दिन भाषणावेळी म्हणाले होते की, ‘माणसाला मरताना सुखाचे मरण यावे अशी आपली इच्छा असते. मात्र मनोहर पर्रीकरांच्या नशिबी ते सुख नव्हते. नाकातून नळया घेऊन त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करावे लागले, कारण त्यांनी फक्त खोटे राजकारण केले. पर्रीकरांनी आणि भाजपने फक्त लोकांना फसवले.’ दरम्यान, या वक्तव्यामुळे आता कॉंग्रेसची चांगलीच गोची झाली असून भाजपने याच मुद्द्यावरून कॉंग्रेसवर तोफ डागली आहे.