ऋतुराज-कॉनवेची शतकी भागीदारी, मोईन अलीचा विकेट्सचा चौकार; सीएसकेने उघडले विजयाचे खाते

चेन्नई- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (CSK vs LSG) संघात चेपॉक स्टेडियमवर झालेला आयपीएल २०२३चा सहावा सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी धावांची बरसात केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊला ७ बाद २०५ धावाच करता आल्या आणि चेन्नईने १२ धावांनी सामना जिंकला. हा त्यांचा हंगामातील पहिला विजय आहे.

चेन्नईच्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून इनफॉर्म कायल मायर्सने २२ चेंडूत ५३ धावा केल्या. या खेळीसाठी त्याने २ षटकार आणि ८ चौकार मारले. तसेच निकोलस पूरनने ३२ धावा केल्या. शेवटच्या षटकात कृष्णप्पा गौतम (नाबाद १७ धावा) आणि आयुष बदोनीने (२३ धावा) किल्ला लढवला. परंतु ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

या डावात चेन्नईकडून फिरकीपटूंनी जबरदस्त गोलंदाजी केली. मोईन अलीने सर्वाधिक ४ विकेट्स काढल्या, ज्यासाठी त्याने केवळ २६ धावा दिल्या. तसेच तुषार देशपांडेने २ आणि मिचेल सेंटनरने एक विकेट काढली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून सलामी जोडीने शानदार भागीदारी केली. फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाडने ३१ चेंडूत ४ षटकर आणि ३ चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. त्याच्या साथीला डेवॉन कॉनवेनेही २९ चेंडूत ४७ धावा फटकावल्या. तसेच अंबाती रायूडू आणि शिवम दुबे यांनीही प्रत्येकी २७ धावा केल्या. शिवाय अंतिम षटकात कर्णधार एमएस धोनीने ३ चेंडूत २ खणखणीत षटकारांसह १२ धावांचे योगदान दिले. या डावात लखनऊकडून मार्क वुड आणि रवि बिश्नोईने प्रत्येकी ३ विकेट्स काढल्या.