राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 : भारताला पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रथमच सुवर्ण, तर लांब उडीत रौप्यपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 : बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी सुरु आहे. सातव्या दिवशी भारताच्या सुधीरने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये (Para Powerlifting) भारताला प्रथमच सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून दिले आहे. यापूर्वी भारताला या प्रकारात आतापर्यंत सुवर्णपदक मिळाले नव्हते. सुधीरने 134.5 गुणांसह गेम रेकॉर्ड केला. पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सुधीर भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे.

तसेच, भारताच्या मुरली श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडीत (Long Jump) आश्चर्यकारक कामगिरी करत ट्रॅक अँड फिल्डमध्ये रौप्य पदक (Silver Medal) जिंकले आहे. श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत 8.08 मीटरची सर्वोत्तम उडी मारून रौप्यपदक जिंकले. भारताच्या लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताला दुसरे पदक मिळवून दिले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात लांब उडी स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारा श्रीशंकर पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.