माझ्या दर्शनाचे जसे तुकडे केले तसेच त्या राहुलचे तुकडे मी करते; दर्शनाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

Pune Crime : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC) राज्यात तिसरी आलेल्या २६ वर्षीय तरुणीचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला आढळल्याने परिसरात खळबळ माजली. दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar Murder) असे या तरुणीचे नाव आहे. दर्शना गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होती. ती हरवल्याची तक्रार नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. दर्शनाच्या हत्येनंतर तिचा मित्र राहुल हंडोरे बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला होता. आता अखेर राहुल हंडोरेला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असून त्याने दर्शनाची हत्या केल्याची कबुलीही दिली आहे.

दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते.  दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारीकताच उरली होती.  त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या.  त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा. तो देखील परूक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि  कुटुंबियांना सांगून पाहिले.  मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.

यानंतर दर्शना पवारच्या आईची आणि भावाची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हटलं आहे दर्शना पवारच्या आईने?
“मला मुंबईला घेऊन जा. माझ्या दर्शनाचे जसे तुकडे केले तसेच त्या राहुलचे तुकडे मी करते. मी एकटीच तुकडे करेन मला कुणाचीच मदत नको. माझ्या मुलीची हत्या केली तशीच मला त्याची हत्या करायची आहे. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि मीच देईन तो न्याय. राहुल हांडोरेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तो जिवंत रहायलाच नको. आणखी १० मुलींचं पुढे नुकसान व्हायला नको. माझी मुलगी गेली, तशी इतर कुणाची मुलगी जाऊ नये. त्यामुळे राहुल हांडोरेला फाशीच झाली पाहिजे.”

दर्शना पवारच्या भावाने काय म्हटलं आहे?
“राहुल हांडोरेला आमच्या ताब्यात द्या किंवा मारुन टाका त्याला. त्याला जिवंत सोडता कामा नये. त्याच्यामुळे माझ्या बहिणीला त्रास झाला आहे, त्याला मारा किंवा आमच्याकडे द्या एवढीच विनंती आहे सरकारला,” असे दर्शनाचा भाऊ म्हणाला आहे.