जवळच्या माणसानेच केला घात! दर्शना पवारच्या मारेकऱ्याला मुंबईतून अटक, कारण आलं समोर

Pune Crime : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC) राज्यात तिसरी आलेल्या २६ वर्षीय तरुणीचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला आढळल्याने परिसरात खळबळ माजली. दर्शना दत्तू पवार असे या तरुणीचे नाव आहे. दर्शना गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होती. ती हरवल्याची तक्रार नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. दर्शनाच्या हत्येनंतर तिचा मित्र राहुल हंडोरे बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला होता. आता अखेर राहुल हंडोरेला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असून त्याने दर्शनाची हत्या केल्याची कबुलीही दिली आहे.

का केली हत्या?

दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते.  दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारीकताच उरली होती.  त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या.  त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा. तो देखील परूक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि  कुटुंबियांना सांगून पाहिले.  मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.

वेगवेगळ्या राज्यात फिरत होता राहुल
दर्शनाच्या हत्येनंतर राहुल बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांनी  राहुलचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पाच पथकं नेमली होती. ही सगळी पथकं मुंबई, सिन्नर, लोणावळा, नाशिक आणि पुण्यात तपास करत होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी राहुलचे आणि दर्शनाचे फोन रेकॉर्ड काढले होते. त्यात दर्शना आणि राहुल नेमकं कोणाकोणाच्या संपर्कात होते याचा शोध पोलीस या रेकॉर्डच्या माध्यमातून घेत होते. राहुलचं लोकेशन चेक करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचं पहिलं लोकेशन  बंगळूरू, कोलकाता आणि त्याचं शेवटचं लोकेशन चंदीगडला दिसत होतं. तो ट्रेनने प्रवास करत असल्याचा अंदाज पोलिसांना होता.

तपासासाठी राहुलच्या कुटुंबियांचा घेतला आधार
तपासासाठी राहुलच्या कुटुंबियांचा आधार घेतला होता. या सगळ्या प्रवासादरम्यान त्याने घरच्यांकडे पैसे मागितले होते. त्याच्या घरच्यांनी त्याला सुरुवातील पाच हजार,  १५०० आणि ५०० रुपये पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अकाऊंटवर पाठवले होते. तो नेमका कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याचा फोन सुरु होण्याची वाट बघत होते. पाच ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरु ठेवला होता अखेर राहुलला ताब्यात ठेण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे.