Supriya Sule | सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी जेष्ठ नेत्यांवर अन्याय करून उद्धव ठाकरेंसोबत डील?

सांगली | सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी त्याचवेळी उघड केले असते तर त्यांच्या नावाला पक्षातंर्गत समर्थन मिळाले नसते. त्याचवेळी पक्ष फुटला असता याची पवारसाहेबांना खात्री होती म्हणूनच सुप्रिया सुळे हे डील उद्धव ठाकरे, संजय राऊत व पवारसाहेब या तिघांनी गुप्त ठेवले. भाजपसोबतच्या डीलमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) मुख्यमंत्री होणार नसल्याने पवारसाहेबांनी अचानक यू टर्न घेतला व भाजपऐवजी शिवसेना – कॉंग्रेससोबत सरकार बनवले आणि महाराष्ट्राच्या माथी कसलाही प्रशासकीय व संसदीय कामाचा अनुभव नसलेला मुख्यमंत्री लादला असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी सांगली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

सन २००४ साली एक वेळा खासदार व तीन वेळा आमदार राहिलेले अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी सक्षम, अनुभवी नव्हते, डॉ. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील,छगन भुजबळ, मधुकरराव पिचड,आर आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनिल तटकरे या सारखे ३ ते ४ वेळा आमदार राहिलेले, मंत्रीपदाचा अनुभव असलेले मातब्बर नेते जर मुख्यमंत्री पदासाठी सक्षम नव्हते,तर २०१९ ला एकदाही आमदार ,खासदार नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेचाही अनुभव नसलेले,प्रशासनातील काहीच अनुभव नसणारे उध्दव ठाकरे पवारसाहेबांच्या दृष्टीने मुख्यमंत्री पदासाठी ‘सक्षम’ व ‘अनुभवी’ कसे झाले ? असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला.

२०१९ साली भाजप सोबतच्या डीलमध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळणार नव्हते,परंतु महाविकास आघाडी स्थापन करताना पहिले अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री व पुढील अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री हा गुप्त फॅार्मुला ठरला होता.शिवसेनेचे तत्कालीन गटनेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. त्यांना बहुतेक सर्व आमदारांचे समर्थनदेखील होते परंतु संजय राऊत व अनिल देसाई यांनी पवारसाहेबांच्या समोर पुढील अडीच वर्षासाठी सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) मुख्यमंत्री करण्याच्या मोबदल्यात पवारसाहेबांनी महाविकास आघाडीचे निमंत्रक म्हणून पहिल्या अडीच वर्षासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडावा असा प्रस्ताव समोर ठेवला. नंतरच्या अडीच वर्षासाठी स्वत: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील,असे ठरले होते असेही उमेश पाटील म्हणाले.

२००४ साली शक्य असताना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री न बनवण्यामागे त्या पदासाठी राष्ट्रवादीमध्ये अनुभवी, सक्षम नेते उपलब्ध नव्हते हे फक्त सांगायचे कारण असून केवळ सुप्रिया सुळेंना भविष्यात राष्ट्रवादीचा पहिला मुख्यमंत्री करण्याचा दूरदृष्टीकोन ठेवून आणि पुत्री प्रेमापोटीच अजितदादांसह अनेक जेष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री पदापासून लांब ठेवले गेले व पक्षाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असा आरोपही उमेश पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करण्यात योगदान देणार्‍या छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, पद्मसिंह पाटील,अजित पवार,आर.आर. पाटील, जयंत पाटील,दिलीप वळसे पाटील,मधुकर पिचड,यांच्यासह तत्कालिन नेत्यांपैकी कुणालाही मुख्यमंत्री न करून,पक्षाच्या उज्वल भविष्यावर अन्याय केला असल्याचेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

रविवारी जेष्ठ नेते शरद पवार यांनी २००४ मध्ये अजितदादा पवार मुख्यमंत्री पदासाठी अनुभवी व सक्षम नव्हते त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री केले नाही, तर छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असते तर त्याचवेळी पक्ष फुटला असता असा गौप्यस्फोट केला. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी रविवारी सांगली येथे पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

शरद पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्याबद्दल आदर आहेच.मात्र शरद पवार यांनी अजितदादा व भुजबळसाहेबांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलणे गरजेचे असून आजच्या तरूण पिढीला व सर्वच कार्यकर्त्यांना तत्कालीन परिस्थिती, घडामोडी, त्यानंतरच्या घडामोडी याबाबत माहिती असणे आवश्यक आहे,म्हणून वस्तुस्थिती मांडल्याचे उमेश पाटील म्हणाले.

२००४ ला अजितदादा पवार सक्षम नव्हते हा केवळ शरद पवार यांचा बहाणा आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व देण्याचे स्वप्न तेव्हापासुन होते.त्यामध्ये अडथळा नको, पक्षातील अजितदादा किंवा अन्य नेत्याला मुख्यमंत्री करून पक्षात समांतर नेतृत्व तयार होऊ नये म्हणूनच मुख्यमंत्री पद घ्यायचे टाळले गेले असा थेट आरोपही उमेश पाटील यांनी केला.

राज्यात २०१९ मध्ये भाजपसोबत जायचे नक्की झाले होते. सर्वांची सहमती होती, शरद पवारसाहेबांच्या परवानगीने व सूचनेप्रमाणे सर्व प्रक्रिया सुरू होती.मात्र तरीही ऐनवेळी निर्णय बदलण्यात आला.कारण अडीच वर्षे उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे व त्यानंतरची अडीच वर्षे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे असे डील ठरले होते.म्हणूनच भाजपसोबत जाण्याचा निर्णय ऐनवेळी बदलण्यात आला. त्यावेळी सर्वच आमदारांनी सरकारमध्ये अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असतील तर सेनेसोबत करण्यात येणार्‍या डीलमध्ये सरकारमध्ये येऊ असे स्पष्ट केले आणि पहाटेचा शपथविधी मोडून अजितदादा पवार सर्व आमदारांच्या प्रेमापोटी परत आले व त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपद देणे भाग पडले असेही उमेश पाटील यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे वसिम नायकवडी, जयश्री पाटील, राधिका हारगे, उषा गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप