ED सरकार अब्दुल सत्तार यांची कार्यतत्परता पाहून त्यांना पुढचा शिक्षणमंत्री करतील – चव्हाण

Mumbai – शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

हिना कैसार अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी दोन्ही मुलींची नावे आहेत.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी याबाबत एक चित्रफीत जाहीर करून हा नाहक बदनाम करण्याचा प्रकार असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे व त्यांना चांगल्या पदी बढती देणारे ED सरकार अब्दुल सत्तार यांची कार्यतत्परता पाहून पुढचा शिक्षणमंत्री करतील. असं चव्हाण यांनी म्हटले आहे.