वडिलांच्या ३०० कोटींच्या संपत्तीवर सोडलं पाणी, अवघ्या ९ वर्षांच्या देवांशी संघवीने घेतला संन्यास

खेळण्या-बागडण्याच्या वयात एका मुलीने अवघ्या ९ व्या वर्षी संन्यास घेतला. वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण ही गोष्ट अगदी खरी आहे. सुरतच्या हिरे व्यापाऱ्याची ९ वर्षांची मुलगी देवांशी संघवी (Devanshi Sanghvi) हिने बुधवारी ३५,००० लोकांच्या उपस्थितीत दीक्षा घेतली. देवांशी ही मोहनभाई संघवी यांची नात आणि धनेश-अमीबेन यांची मुलगी आहे. वेसू येथे १४ जानेवारीपासून देवांशीच्या दीक्षा महोत्सवाला सुरुवात झाली.

या दीक्षा कार्यक्रमात, ४ हत्ती, ११ उंट आणि २० घोड्यांचा सहभाग होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, देवांशीला लहानपणापासूनच अध्यात्माची आवडी होती. तिने ५०० किमीची पदयात्राही पूर्ण केली आहे.

तिचे वडील कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत. देवांशीचे वडील धनेश संघवी हे हिऱ्याच्या एका जुन्या कंपनीचे मालक आहेत. धनेश संघवी अँड सन्स कंपनी त्यांचे वडील महेश संघवी यांनी स्थापन केली आहे.

या हिरा कंपनीच्या अनेक शाखा देश-विदेशात आहेत. या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे १०० कोटी आहे. देवांशी ही त्यांची मोठी मुलगी आहे. कंपनीची जबाबदारी भविष्यात तिलाच मिळणार होती. परंतु, संपत्तीचा त्याग करुन देवांशीने अध्यात्मिक मार्ग निवडला. कोट्यवधींची संपत्ती असूनही संघवी कुटुंब अत्यंत साधे जीवन जगते.

देवांशीने धार्मिक शिक्षणात विशेष प्राविण्य मिळविले. त्यावर आधारित प्रश्नमंजुषेत तिने सुवर्णपदक पटकावले. तिचे हिंदी, इंग्रजी, संस्कृत, जरवाडी आणि गुजराती भाषांवर प्रभुत्व आहे. याशिवाय तिने संगीत, भरतनाट्यम आणि योगाचे शिक्षण घेतले आहे. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, देवांशीने आजपर्यंत कधीही टीव्ही पाहिला नाही.