Govt Scheme: प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत शोभिवंत  मत्स्यपालन व पर्यटनात्मक मत्स्यव्यवसायाचा विकास योजना 

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत (PM Matsya Sampada Yojana) शोभिवंत मत्स्यपालन व पर्यटनात्मक मत्स्यव्यवसायाचा विकास योजना

योजनेचे स्वरुप
या योजनेअंतर्गत परसबागेतील लघु आकारातील शोभिवंत मत्स्यप्रजाती संगोपन व संवर्धन प्रकल्प सुरू करता येतात.(सागरी व गोड्या पाण्यातील शोभिवंत मत्स्यप्रजाती करिता)

योजनेच्या अटी
●प्रकल्पाकरीता लाभार्थ्यांनी तांत्रिक व आर्थिक बाबींचा तपशीलवार असलेला सर्वसमावेशक प्रस्ताव जमिनीच्या कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.
●वैयक्तिक लाभार्थी, बचत गट, मच्छिमार सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट, मत्स्यउत्पादक संघटना आदी या योजनेचा लाभ घेवू शकतात.
●शोभिवंत मत्स्यजाती संवर्धन प्रकल्पाच्या उभारणीकरिता आवश्यक मुबलक पाणी पुरवठ्यासह स्वतःची  ३०० चौ. फूट रिक्त जागा किंवा ७ वर्षाच्या कालावधीकरिता नोंदणीकृत भाडेपट्टीतत्वावरील ३०० चौ. फूट जागा उपलब्ध असावी.
●प्रकल्पामध्ये शोभिवंत मत्स्यप्रजाती संवर्धनासाठी सिमेंट टाक्या व काचेच्या टाक्यांचा तसेच संरक्षणात्मक छताचा समावेश असावा.
●प्रकल्प किमतीमध्ये भांडवली खर्च, आवर्ती खर्च व देखभाल खर्चाचा समावेश असावा.
●शासकीय अनुदान हे प्रति प्रकल्प एक व्यक्तिपूरते मर्यादित असेल. तसेच स्वयंसहाय्यता गटातील सदस्यांना देखील ते प्रदान करण्यात येईल जे एकत्र येवून सदर युनिट एकत्रित प्रकल्प म्हणून स्थापन करतील.
●प्रकल्पकरिता मंजूर करण्यात आलेले शासकीय अनुदान हे प्रति प्रकल्प एक व्यक्तिपूरते मर्यादित असेल. ग्रुपकरिता जास्तीत जास्त २० युनिट अनुदानास पात्र असतील. तथापि, उद्योजक संस्था व कंपन्या यांच्यासाठी अंमलबजावणीबाबत आणि उच्चतम मर्यादेबाबत केंद्रीय मंजुरी समिती अंतिम निर्णय घेईल.

योजनेअंतर्गत लाभ
३ लाखाच्या प्रकल्प किंमतीस सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४० टक्के अनुदान अर्थात १ लाख २० हजार रुपये व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला यांच्यासाठी ६० टक्के अनुदान अर्थात १ लाख ८० हजार रुपये.

अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय तसेच जिल्हास्तरीय सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा