“आज स्वत: हुकूमशाह झालात”, साडीच्या मुद्यावरून भाजपाचे सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र

मुंबई- ‘चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्नायझेशन करतोय’, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशातच भाजपानेही जुने प्रकरण उकरून काढत सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र सोडले आहे.

काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपावर निशाणा साधला होता. कर्नाटकमध्ये काही विद्यार्थ्यांना हिजाब घालायला बंदी घातली होती, यावरून देशभरात वातावरण तापलं होतं. याच मुद्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेही भाजपावर बरसल्या होत्या.

‘कोणते कपडे घालायचे हेच ठरवणार, काय खायचं हेच ठरवणार, कुठे जायचं- कधी जायचं हेच ठरवणार, काय बोलायचं-काय नाही बोलायचं हेच ठरवणार, काय शेअर करायचं- काय फॉरवर्ड करायचं हेच ठरवणार, मग याला हुकुमशाही म्हणायची’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीका केली होती. केंद्रिय अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात त्यांनी हे भाष्य केलं होतं.

मात्र आता सुप्रिया सुळेंनी चॅनेलमधल्या मुलींना साडी नेसण्याचे वक्तव्य केले असून याच मुद्यावर आता त्या स्वत: हुकूमशाह झाल्या आहेत, अशी खरपूस टीका भाजपाने केली आहे. ‘सुप्रियाजी नेहमी खरं बोललं पाहिजे, नेहमी खऱ्याच राजकारण केलं पाहिजे. कधी काय बोललं हे लक्षात ठेवण्याची गरज भासत नाही. नाहीतर अशी पंचायत होते’, असं भाजपाने म्हटलं आहे.