पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट; म्हणाले,…

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते. मात्र त्यानंतर फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.

दरम्यान,  गोपनीय कायद्याचा भंग केला आहे आणि मीच आरोपी आहे, असे प्रश्न मला विचारण्यात आले असल्याचे दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबई पोलिसांनी दोन तास चौकशी केल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला. यापुढेही राज्य सरकारचे काळे कारनामे बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी म्हटले. सभागृहात उपस्थित करत असलेल्या प्रश्नामुळे ही चौकशी दबावासाठी करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यातील बदल्यांच्या महाघोटाळ्याची माहिती केंद्रीय गृह सचिवांना दिली. या महाघोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. याआधी महाघोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारने दाबून ठेवला होता. राज्य सरकारने कोणतीच कारवाई केली नव्हती असेही फडणवीस यांनी म्हटले. वेळेत राज्य सरकारने याची चौकशी केली असती तर हे करावं लागलं नसतं असेही फडणवीस यांनी म्हटले.

आजच्या चौकशीचा रोख असा होता की, जणूकाही ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टचं जणूकाही मी उल्लंघन केलं आहे. मला आरोपी, सहआरोपी बनवण्यात येईल का अशा प्रकारचे प्रश्न होते असाही गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मी अतिशय जबाबदार नागरिकासारखं सर्व संवेदनशील मटेरिअल प्रसिद्धीच्या मागे न लागता संबंधित यंत्रणेला दिलं आहे. माझा जबाब नोंदवण्याचा उपक्रम झाला आहे त्यातून सरकारला काही हाती लागणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.