‘कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं, अन्यथा कायदा आपलं काम करेल’

मुंबई : दसरा मेळाव्याची शिवसेना व शिंदे गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. जास्तीत जास्त गर्दी कशी होईल या दृष्टीने उभय बाजूने प्रयत्न केले जात आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत शिंदे यांना लक्ष्य करण्यात आले, तर शिंदे गटाच्या चित्रफितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांचा हवाला देत शिवसेनेला टोला लगाविण्यात आला आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक इशारा दिला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून भाषणं केली पाहिजेत. भाषण करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था नीट राखली जाईल. दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले. दोन्हीकडील कार्यकर्ते देखील कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न करतील असे फडणवीसांनी यावेळी सांगितलं.