आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत – फडणवीस 

 पणजी – शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी अटकेत असलेले राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काल दिली. दरम्यान सुपे यांच्या पुण्यातल्या घरी पोलिसांनी काल धाड टाकली. यावेळी 2 कोटी 40 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

दरम्यान, या मुद्यावरून विरोधीपक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले.म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार  करणाऱ्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले.

आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी .

सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की,लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.