सावधान: तुम्हालाही +84, +62, +60 सारख्या नंबरवरुन व्हॉट्सअप कॉल्स येतायत तर आधी ही बातमी वाचा!

Whats App Call Scam: सर्व चुकीच्या कारणांमुळे व्हॉट्सअॅप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. व्हॉट्सअॅप (Whats App) हे आधी हेरगिरीसाठी कुप्रसिद्ध होते आणि आता पुन्हा कंपनीवर असाच आरोप होत आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर अभियंत्याचे ट्विट रिट्विट केले. या ट्विटमध्ये, अॅप आणि इंटरनेट बंद झाल्यानंतरही व्हॉट्सअॅप फोनच्या मायक्रोफोनमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या स्पॅम कॉलमुळे लोक हैराण झाले आहेत.

तुम्हालाही एखाद्या अनोळखी नंबरवरून व्हिडिओ किंवा व्हॉईस कॉल येत असल्यास किंवा +84, +62, +60 नंबरवरून कॉल येत असल्यास, तुम्ही ते हलक्यात घेऊ नका. असे कॉल तुम्हाला वाईटरित्या अडकवू शकतात आणि तुमच्याकडून पैसे मिळवू शकतात. या संदर्भात सरकारकडून अलर्टही जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊया सविस्तर…

+84, +62, +60 वरून व्हॉट्सअॅप कॉल एक मोठा घोटाळा
गेल्या काही महिन्यांपासून +84, +62, +60 पासून सुरू होणार्‍या व्हॉट्सअॅप नंबरवरून कॉल्समध्ये मोठी वाढ झाली आहे. मलेशिया, केनिया, व्हिएतनाम आणि इथिओपियामधून असे कॉल येत आहेत. या ISD नंबरवरून येणारे कॉल हे सहसा व्हिडिओ कॉल असतात. याशिवाय भारतीय कोड नंबरवरून येणारे अनोळखी कॉल्सही धोकादायक आहेत. या क्रमांकांवरून व्हिडीओ कॉल्स केले जात असून, कॉल आल्यानंतर काही समजेल तोपर्यंत या सायबर गुंडांनी आपले काम केलेले असते.

त्यांना फक्त काही सेकंदांचा व्हिडिओ हवा आहे ज्यामध्ये तुमचा चेहरा दिसतो. यानंतर तुमचा चेहरा अश्लील व्हिडिओसोबत एडिट करून तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा खेळ सुरू होतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे.

या घोटाळ्याबद्दल व्हॉट्सअॅपने काय म्हटले?
या प्रकाराबाबत व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल आला तर तो रिसीव्ह करू नका. कॉल नाकारल्यानंतर त्वरित तक्रार करा आणि अशा नंबरला ब्लॉक करा. याशिवाय आजकाल नोकरीसंदर्भातही असे फोन येत आहेत. असे नंबर देखील ब्लॉक करा. अलीकडेच WhatsApp ने अशाच प्रकारच्या स्पॅमसाठी 4.7 दशलक्ष खाती ब्लॉक केली आहेत.