चिंताजनक : लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही होतेय ओमिक्रॉनची बाधा

नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या डेल्टा या प्रकारापेक्षा ओमिक्रॉन या उत्परिवर्तित प्रकाराचा संसर्गाचा वेग असून लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही त्याची बाधा होत आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनी काल दिला.

कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेल्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग होत असल्याचं आढळून आलं आहे, असंहि त्यांनी सांगितलं. संसर्ग वाढत असल्यानं, ओमिक्रॉन हा कमी घातक असल्याचं समजून त्याकडं दुर्लक्ष करणं धोकादायक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. नाताळच्या सुट्यांचा काळ सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य संघटनेनं हा इशारा दिला आहे.

दरम्यान, ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यानं पुढील महिन्यात 17 ते 21 जानेवारी दरम्यान नियोजित असलेली जागतिक व्यापार परिषद पुढं ढकलण्यात आली आहे. सशक्त अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा आणि बड्या उद्योगपतींचा सहभाग असलेली ही परिषद आता उन्हाळ्यात होणार असल्याचं जागतिक व्यापार परिषदेतर्फे सांगण्यात आलं आहे.