वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली? डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले खरे कारण

नवी दिल्ली- जम्मू (Jammu) मधील कटरा (Katra) येथील वैष्णोदेवी मंदिरामध्ये रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. रात्रीच्या सुमारास अचानक गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरी झाली.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून भरपाई जाहीर करण्यात आली आहे. माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना PMNRF कडून प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जातील, असे पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले आहे. जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. शिवाय मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी शनिवारी सांगितले की, काही तरुणांमधील किरकोळ भांडणामुळे वैष्णो देवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 12 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की ही घटना अत्यंत दुर्दैवी असून पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.

सिंह म्हणाले की, घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही तरुण मुलांमध्ये काही मुद्द्यावरून भांडण झाले आणि काही सेकंदातच चेंगराचेंगरी झाली.  पोलीस आणि प्रशासनाने त्वरीत प्रतिसाद दिला आणि गर्दीत तात्काळ व्यवस्था पूर्ववत करण्यात आली .