बैलगाडा शर्यतीला अचानक स्थगिती दिल्यामुळे बैलगाडा मालक नाराज 

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिल्या नंतर आता बैलगाडा शर्यत आयोजित करण्यासाठी राजकीय नेत्यांची लगबग सुरु झाली आहे. बैलगाडा शर्यत ही अनेकगावांची परंपरा आहे. अनेक वर्षे चाललेल्या या लढाईत अखेर विजय मिळाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला होता.

दरम्यान, काही वर्ष ही परंपरा कोर्टांने बंदी घातल्यामुळे बंद पडली होती आता ती पुन्हा चालू होणार असल्याने बैलगाडा मालकांसह नागरिकांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळत असतानाच कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी – लांडेवाडी आणि मावळ तालुक्यातील नानोली तर्फे चाकणमधील आज (ता. १) होणाऱ्या बैलगाडा शर्यतीला (Bullock cart race) पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज्यात वाढती करोना रुग्णसंख्या लक्षात घेता सरकारने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून काही निर्बंध लागू केले आहेत. यासोबतच दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार देखी मोठ्या संख्येने होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात इतर गोष्टींवर निर्बंध लागू केले जात असताना नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेल्या बैलगाडा शर्यतींना देखील स्थगिती देण्यात आली आहे.

शासनाकडून नव्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये धार्मिक आणि सामाजिक नागरिकांची जास्तीतजास्त 250 नागरिक उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शर्यतीदरम्यान 250 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याने बैलगाडी शर्यती स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे अनेकजण नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.