राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला ईडीचा दणका; तब्बल १३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

नागपूर-   गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारमध्ये असणारे मंत्री आणि नेते यांचे घोटाळे समोर येत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या तोंडचे पाणी पळवले असताना आता अंमलबजावणी संचालनालयाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ईडीकडून डिसेंबर महिन्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (Maharashtra State Cooperative Bank) साखर कारखान्यांच्या (Sugar Factory) घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल नऊ तास त्यांची चौकशी (Inquiry) झाली होती. त्यानंतर आज ईडीकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. यावेळी तनपुरेंची एकूण 13 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

केंद्रातील विविध तपास यंत्रणांनी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख काही महिन्यांपासून अटकेत आहेत. तसंच नवाब मलिक यांच्यावरही काही दिवसांपूर्वीच अटकेची कारवाई करण्यात आली असून ते ईडी कोठडीत आहेत. त्यानंतर आता कारवाई झालेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यावर राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे, तसंच ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जवळचे नातेवाईकही आहेत.