काँग्रेसवाले बिचारी म्हणून मतं मागतील, पण ज्याचं काम त्यानं करावं – महाडिक 

कोल्हापूर – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर (kolhapur north)मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव (chandrkant jadhav) हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. भाजपने ही निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली असून महाविकास आघाडी देखील ही जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा सामना या मतदार संघात होत आहे. दरम्यान, भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असतानाच आता भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahdik) यांचं एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत महाडिक म्हणत आहेत, काँग्रेसचे लोक आता येतील आणि सांगतील एक महिला आम्ही उभा केली आहे. तुम्ही सगळ्या महिला आहेत. ती बिचारी आहे, तिला मतदान करा. पण मला सांगा तुमच्या कुटुंबातील तुमचा पती एखादा प्लंबर असेल तर ते काम उद्या तुम्हाला जमणार आहे का? तुमचा एकादीचा नवरा इलेक्ट्रीशन असेल तर ते काम उद्या तुम्हाला जमणार आहे का? ज्याचं कामं त्याने करायचं असतंय”, असे म्हणताना महाडिक या व्हिडिओत दिसून येत आहे.