धनंजय मुंडे राज ठाकरेंवर बरसले; अर्धवटराव म्हणत उडवली खिल्ली

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यात झालेल्या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पक्षावर जोरदार टीका केली. या टीकेवर सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (dhananjay munde ) जोरदार बरसले. धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे(raj Thackeray) यांना अर्धवटराव अशी उपमा देत जोरदार टीकास्त्र डागलं.

पूर्वी रामदास पाध्ये (Ramdas padhye) यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या (BJP) बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवली.अर्धवटराव आधी भाजपच्याविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे, ईडी (ED)  घुसली आणि अर्धवटराव गप्पच बसले, असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची इस्लामपूर येथील जाहीर सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार भाषण करून भाजपवर एकच हल्लाबोल केला. धनंजय मुंडे यांना अलीकडेच ह्रदयविकाराच्या सौम्य धक्का आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर झालेल्या सभेत बोलत असताना धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक दिवस मुख्यमंत्री होणार असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे 100 च्या वर आमदार येतील, फक्त जयंत पाटील साहेब आपल्या टप्यात निवडणूक घ्यावी असेही मुंडे यावेळी म्हणाले.