दिग्पाल लांजेकर यांचा ‘गुरुकुल’ पुरस्काराने सन्मान

पुणे – शिवराय अष्टक जगणाऱ्या, साकारणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण युनिटबरोबर चित्रीकरण स्थळी ‘गुरुकुल’ पुरस्काराने दिग्पाल लांजेकर यांचा सन्मान होत आहे, हा दुर्मिळातील दुर्मिळ योग आहे, असे प्रतिपादन चित्रपट सृष्टीचे पितामह ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले.

आद्य संगीताचार्य बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांच्या घराण्याचा आशिर्वाद म्हणून विश्वरूप कन्सेप्ट डेव्हलपर्स आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट तर्फे राजदत्त यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. मावळातील कुसगाव येथील पीबीए फिल्मसिटीत शुटींग दरम्यान हा सोहळा पार पडला. या प्रसंगी दिग्पाल लांजेकर यांचे गुरू ज्येष्ठ लोकशाहीर दादा पासलकर, दिग्पाल यांच्या मातोश्री सुनिता लांजेकर, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे, अभिनेते चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, मिलिंद कांबळे, संकलक भक्ती मायाळू, योगेश फुलफगर (Sunita Lanjekar, Senior Painter Suhas Bhole, Actors Chinmoy Mandlekar, Ajay Pokalkar, Milind Kamble, Compiler Bhakti Mayalu, Yogesh Phulfgar) आणि युनिटचे तंत्रज्ञ, कलाकार उपस्थित होते. प्रस्तावना आणि सूत्रसंचालन माध्यमकर्मी गिरीश केमकर यांनी केले, तर मानपत्राचे वाचन अमृता धायरकर यांनी केले.

शिवराय अष्टकाचे शिवधनुष्य दिग्पाल लांजेकर यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून समर्थपणे पेलले आहे. आज नव्वदीत त्यांनी दिलेली भूमिका मोठ्या आनंदाने मी पार पाडत आहे, असे मनोगत श्री. राजदत्त यांनी व्यक्त केले. वेगवेगळी आव्हाने, अनेक अडचणीतून मार्ग काढताना माझ्यासह संपूर्ण युनिटलाच या गुरुकुल पुरस्काराने मोठी उमेद, ऊर्जा मिळेल, असे मनोगत श्री. लांजेकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी ते पुढे म्हणाले की, मुळात कुणीतरी कोणाच्यातरी भावनांचा आदर करत नाही म्हणून वाद निर्माण होतात. छत्रपती शिवाजी महाराज हेआपल्या महाराष्ट्राचे सर्वोच्च दैवत आहे. आठ ते ऐशी अशा सर्वच वयोगटातील प्रत्येकाच्या भावना, संवेदना शिवचरित्राशी निगडीत आहेत. या भावनांना कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेतल्यानेच ‘शिवराय अष्टक’ कोणताही वाद न होता पूर्णत्वास गेले आहे. दिग्पालचे यश हे उत्तम सांघिक कार्यात आहे, हे कुणा एकाचे कामच नाही, अशी भावना श्रीमती सुनीता लांजेकर यांनी व्यक्त केली.