विवोसह अनेक चिनी मोबाईल कंपन्यांवर ईडीची मोठी कारवाई, ४० हून अधिक ठिकाणी छापे

नवी दिल्ली –  केंद्रीय तपास एजन्सी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विवोसह (VIVO) अनेक चीनी मोबाइल कंपन्यांवर (Chinese mobile companies) मोठी कारवाई सुरू केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपासून ईडी या मोबाईल कंपन्यांच्या बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह अनेक राज्यांमधील 40 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकत आहे. मात्र, कोणत्या कंपन्यांवर छापे टाकले जात आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. चिनी मोबाईल कंपन्या मनी लाँड्रिंगच्या (Money laundering) आरोपावरून ईडीच्या (ED) रडारवर आहेत.

एप्रिलमध्ये, ईडीने रेडमी (REDMI) आणि एमआय (MI) सारख्या लोकप्रिय मोबाइल फोन ब्रँड बनवणारी चीनी मोबाइल कंपनी शाओमीची (Xiaomi) कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर ईडीने ही कारवाई केली. ईडीने शाओमी इंडियाची ५,५५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. शाओमी रॉयल्टीच्या नावाखाली आणि कर चुकवण्याच्या नावाखाली देशाबाहेर पैसे पाठवत असल्याचा आरोप आहे.

2020 मध्ये भारत आणि चीनमधील सीमेवरील तणावानंतर चिनी कंपन्यांविरोधात सरकारी यंत्रणांची चौकशी कडक झाली आहे. तेव्हापासून, टिकटॉकसह 200 हून अधिक चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. मे महिन्यात चीनने सांगितले की तो भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार $125.66 अब्ज इतका आहे. चीनने भारतासोबतचा व्यापार अधिक सामान्य करण्यासाठी उपाययोजना करण्याची तयारी दर्शवली होती.