पार्थ पवार शंभूराज देसाईंच्या भेटीला; राजकीय भूकंप होणार ? 

मुंबई  – राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोड्या करताना पाहायला मिळत आहेत.  यातच आता  विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे आता पुन्हा चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार गेले आहेत.

पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांचा शासकीय बंगला असलेल्या पावनगडवर जाऊन देसाई यांची भेट घेतली. यावेळी पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट चर्चा झाली. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट का घेतली? तसेच या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.

पार्थ पवार शिंदे गटाच्या नेत्याची भेट घेत असल्याने पडद्यामागे नेमकं काय घडत आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. पार्थ पवार हे काहीसे बंडखोर स्वभावाचे आहेत त्यामुळे या भेटीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, पार्थ यांनी थेट शिंदे सरकारमधील मंत्र्याची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Partha Pawar meets Shambhuraj Desai; Will there be a political earthquake?).