‘मला ठाण्याला दाखवायची गरज नाही मात्र महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे’

जळगाव : पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात जळगावातील विजय पाटील (Adv.Vijay Patil) यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काल सकाळीच पुणे पोलिसांच्या (Pune Police) पथकाने जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केली आहे.जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस जळगावात दाखल झाल्याने महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गिरीश महाजन यांच्यावर मोक्काची कारवाई होणार असून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.दरम्यान, एकाबाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती शनिवारी समोर आली.

यावरून  त्यांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांनी शंका उपस्थित केली आहे.खडसे म्हणाले, ईडीची चौकशी लागल्यामुळे एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा करोना झाला, अशी प्रतिक्रिया काही महिन्यांपूर्वी गिरीश महाजन यांनी दिली होती. मात्र त्यावेळी मला खरंच करोना झाला होता. आताही गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोना झालेला आहे. मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसत आहे आणि त्या भीतीतूनच त्यांना करोना झाल्याचा संशय आहे. तरीही माझी प्रार्थना आहे की, गिरीश महाजन लवकर बरे व्हावेत, त्यांची समाजाला गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे. त्यांची प्रकृती उत्तम राहावी, अशी मी प्रार्थना करणार आहे,’ असं यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान, खडसे यांनी केलेल्या या टीकेला महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ईडीच्या धाकाने एकनाथ खडसे हे चार वेळा कोरोना बाधीत झाले. अपंगाचे खोटे प्रमाणपत्र काय काढले, त्या प्रकरणी दिव्यांग बांधवांनी त्यांच्याविरूध्द आंदोलने केली. आता ते मोक्काच्या धाकाने आपल्याला कोरोना झाल्याचे म्हणत असले तर त्यांना खरोखर ठाण्याच्या उपचाराची गरज आहे.

आता पुन्हा एकदा खडसे यांनी महाजन यांना डिवचले आहे. ते म्हणाले, मला ठाण्याला दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे असं म्हणत जोरदार टीका केली आहे.