गरब्यामध्ये हिंदू धर्माच्या व्यक्तींनाच प्रवेश द्या हे सांगणे म्हणजे धर्मा धर्मात भांडणे लावणे -तृप्ती देसाई

Navratri 2022 : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला (Shardiya Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये गरबा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या गरबा उत्सवासंदर्भात विश्व हिंदू परिषदेनं (Vishwa Hindu Parishad) एक लक्ष्यवेधी मागणी केली आहे.(Allow only Hindus to play Garba, demands Vishwa Hindu Parishad)

गरबा हा श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय असून सार्वजनिक इव्हेंट नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्याआणि त्यासाठी आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना केली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, नवरात्र हा सण सगळीकडे साजरा केला जातो.हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे, आणि या उत्सवामध्ये आपल्या भारतात सगळ्यात जाती-धर्माचे लोक आनंदाने सहभागी होतात. परंतु काही धर्माधर्मात तेढ निर्माण करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या इतर धर्मियांवर वारंवार चुकीचे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत, ते त्यांचे काम चोख करतीलच. परंतू गरब्यामध्ये आधार कार्ड घेऊनच सोडा किंवा हिंदू धर्माच्या व्यक्तींनाच त्यामध्ये प्रवेश द्या हे सांगणे म्हणजे धर्मा धर्मात भांडणे लावणे आणि लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे…. विश्व हिंदू परिषदेची असली दादागिरी येथे खपवून घेतले जाणार नाही असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.