३० लाखात विकले गेले कॉंग्रेसकडून निवडणुकीचे तिकीट? कॉंग्रेसच्याच पदाधिकाऱ्याने आरोप केल्याने उडाली खळबळ

पणजी – गोव्यात भाजपचा पराभव करण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरलेल्या कॉंग्रेसच्या अडचणी सध्या बऱ्याच वाढू लागल्या आहेत. भाजपकडून कॉंग्रेसला लक्ष्य केले जात असताना दुसऱ्या बाजूला स्वपक्षीय नेत्यांच्या नाराजीचा देखील आता कॉंग्रेसला सामना करावा लागत आहे.कॉंग्रेसकडून उमेदवारांची घोषणा होऊ लागताच आता कॉंग्रेसमधील काही इच्छुक नेते तसेच निष्ठावंत नेते आपल्याच पक्षावर तोफा डागू लागले आहेत.

तृणमूल काँग्रेस पक्षातून काँग्रेस पक्षात आलेले तियात्रिस्त टोनी डायस यांना काँग्रेसने बाणावलीची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. कारण या मतदार संघातील निवडणूक तिकीट 30 लाखांना विकले गेल्याचा आरोप काँग्रेसच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यकरिणी सरचिटणीस जीना परेरा यांनी केला आहे.

आम्हाला गप्प बसा असे सांगण्यात येते. पण आमच्यावर अन्याय झाला असताना आम्ही गप्प कसे बसू, असा सवाल परेरा यांनी उपस्थित केला. बाणावलीची उमेदवारी 30 लाख रुपयांना विकली गेली असा जो आरोप होतोय, तो खराच असावा असे आता वाटू लागले आहे असे त्या म्हणाल्या. पक्षाचे उमेदवार टोनी यांच्यासाठी आम्ही काम करणार नाही हे स्पष्ट करत आता काय करायचे ते मतदारांनीच ठरवायचे असेही त्या म्हणाल्या.

गोवा फॉरवर्डपासून सर्व पक्षांकडे चाचपणी करून शेवटी टोनी तृणमूल काँग्रेस पक्षात सामील झाले होते. ज्या दिवशी त्यांना तूणमूलमधून काँग्रेस (TMC) पक्षात घेतले जाते, त्या दिवशी सकाळपर्यंत ते तृणमूलचा प्रचार करीत होते. सायंकाळी त्यांना काँग्रेस पक्षात घेतले जाते आणि 48 तास उलटण्यापूर्वीच उमेदवारी दिली जाते. हे सगळे कोणाच्या सांगण्यावरून केले गेले? अशा उमेदवाराला मतदान करा असे आवाहन आम्ही लोकांना कोणत्या तोंडाने करायचे, असा सवाल उपस्थित करत परेरा यांनी आपल्याच पक्षाला लक्ष्य केले आहे.