Emergency alert : Severe : तुम्हालाही असा मेसेज आला आहे का? जाणून घ्या, काय आहे हा प्रकार

पुणे : आज अनेकांच्या मोबाईलवर सकाळपासून एक विशिष्ट प्रकारचा अलर्ट मेसेज येत आहे. याशिवाय मोबाईल खूप जोरात व्हायब्रेट होत असून व्हॉइस नोटिफिकेशन येत आहेत. यामुळे हा मेसेज नेमका काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Emergency alert : Severe. This is test alert from Department of Telecommunications, government of india. 20-07-2023 असा इंग्लिशमध्ये तर “हा भारत सरकारच्या दुरसंचार विभागाकडून एक चाचणीचा इशारा आहे. 20-07-2023” असा मराठीमध्ये अलर्ट मेसेज डिसप्ले होत आहे.

याबाबत सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भारत सरकारचा एक चाचणी उपक्रम आहे. भारत सरकारने मोबाईल फोनवर विशिष्ट स्थानांवर काही आपत्कालीन सूचना पाठवण्यासाठी मोबाईल अलर्ट सिस्टम (MAS) लागू केली आहे. प्रामुख्याने चक्रीवादळ, भूकंप आणि इतर आपत्कालीन परिस्थितींसाठी ही यंत्रणा वापरली जाणार असल्याची माहिती आहे. भविष्यात आपल्या भागात काही Emergency असेल आणि आपल्याला असा Alert आल्यास त्यावर दिलेल्या सूचना जरूर वाचा आणि त्याप्रमाणे कार्य करा असं सांगण्यात येत आहे.