प्रत्येकाने आपण देशासाठी काय करू शकतो यांचा विचार केला पाहिजे – मंगल प्रभात लोढा 

मुंबई :  आजचे हे प्रदर्शन म्हणजे केवळ ऐतिहासिक फोटोंचे प्रदर्शन नाही तर  प्रत्येक फोटो मध्ये एक गोष्ट आहे, या गोष्टी फक्त सांगण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी नाहीत, आज भारतात ज्या पद्धतीने  बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसत आहेत त्यामुळे भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यासोबत असे पुन्हा घडू नये यांची काळजी घेण्यासाठी यातून शिकण्याची गरज आहे. आजघडीला देशाची जबाबदारी फक्त सरकारवर ढकलून चालणार नाही. प्रत्येकाने आपले काम सांभाळून आपण देशासाठी काय करू शकतो यांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी केले.

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांनी जाहीर केल्या नुसार 14 ऑगस्ट हा दिवस ‘विभाजन विभीषिका दिवस म्हणून साजरा केला जात आहे.  सांस्कृतिक मंत्रालया ने दिलेल्या निर्देशना नुसार सोमवारी इंडियन बँक च्या वतीने त्यांच्या फोर्ट मुंबई कार्यालय येथे या भीषण दिवसावर उजाळा टाकण्यासाठी एक फोटो प्रदर्शन आयोजित केले होते, त्यांच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री लोढा बोलत होते. यावेळी इंडियन बँकेचे फील्ड जनरल मॅनेजर,एस एस पी रॉय,स्वातंत्र्य सेनानी श्रीमती गुणवंती जोशी, स्वातंत्र्य सेनानी श्रीमती प्रतिभा देसाई आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, भारतात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते, मात्र इंग्रजांच्या एका निर्णयाने धर्माच्या नावावर देशाचे दोन तुकडे झाले आणि लाखो परिवार बेघर झाले, अनेक कुटुंब विभक्त झाली, हजारो लोकांचा मृत्यू या देशाच्या फाळणी दरम्यान झाला, असंख्य कुटुंबांना आपले आप्तस्वकीय जीवंत आहे की नाहीत हे सुद्धा कळले नाही, विशेषता कुटुंबापासून दुरावलेल्या महिलांचे, त्यांचे धर्माचे पुढे काय झाले हे माहीत नाही,  यामुळे  त्यांचे कुटुंबीय त्यांना श्रद्धांजली सुद्धा वाहू शकले नाहीत. या घटनेला जबाबदार कोण? असंख्य लोकांची त्यात काय चूक होती?  असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला.

तसेच, इंडियन बँकेचे मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्साहाने हे प्रदर्शन भरविले आहे. माझी एस. एस. पी. रॉय साहेबांना विनंती आहे की, हे प्रदर्शन झाल्यानंतर त्यांनी हे फोटो मला द्यावेत मंत्रालयाच्या सेंट्रल हॉल मध्ये 5 ते 7 दिवस हे प्रदर्शन भरविण्याची माझी इच्छा आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे लोक याला पाहतील असेही लोढा म्हणाले.

इंडियन बँकेचे फील्ड जनरल मॅनेजर,  एस. एस. पी. रॉय म्हणाले की, उद्या इंडियन बँकेचा 170 वा स्थापना दिवस आहे, त्यामुळे आज मंत्री महोदयांच्या उपस्थितीत होत असलेला हा कार्यक्रम त्यांची शोभा वाढविणार आहे. फाळणीची घोषणा झाल्यानंतर लाखो लोक विस्थापित झाले, हा केवळ प्रवास नव्हता तर अत्यंत वेदनादायी काळ होता. आज स्वातंत्र्याच्या अमृत काळातून मागे वळून बघितले तर जाणवते की स्वातंत्र्य लढ्यातील वीरांनी, शहीदांनी ज्या भारताची कल्पना केली असेल ती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास येत आहे. या विकासाच्या वाटचालीत, आर्थिक जडणघडणीत इंडियन बँकेचे योगदान महत्वपूर्ण आहे यांचा आम्हाला अभिमान वाटतो. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन  वजाहात अली, मुख्य प्रबंधक, सरकारी व्यवसाय, यांनी केले.