पुण्यात अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जागेत अतिक्रमण करून खोदकाम; शिवसेनेच्या नेत्यावर गुन्हा दाखल 

पुणे – अभिनेत्री उषा चव्हाण (Actress Usha Chavan) यांच्या खडकवासला परिसरातील जांभळी (Jambhali) गावात असलेल्या जमिनीवर अतिक्रमण (Encroachment) करून खोदकाम (Excavation) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे (Deputy City Chief Rajendra Dhankude) यांच्या विरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ह्दयनाथ दत्तात्रय कडू  (वय 52, रा. ट्रेझर पार्क, सातारा रस्ता) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कडू हे ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण-कडू यांचे चिरंजीव आहे. फिर्यादी यांच्या आई उषा चव्हाण यांनी 1999 मध्ये हवेली तालुक्‍यातील जांभळी येथे गट क्रमांक 335 मध्ये साडे सहा एकर जागा सीताराम पवार यांच्याकडून खरेदी केली होती.

दरम्यान, शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांनी फिर्यादीकडे फिर्यादीच्या जागेतुन जलवाहिनी टाकण्यासाठी चर खोदण्याबाबत विचारणा केली होती. त्यास फिर्यादी यांनी विरोध दर्शवून, जलवाहिनी रस्त्याच्याकडेने करण्याबाबत सांगितले. रविवारी दुपारी, फिर्यादी यांना गडदे यांनी फोन करुन त्यांच्या जागेत जेसीबी आणण्यात आला असून तेथे खोदाई सुरु असल्याची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी, त्यांची मुले व आई घटनास्थळी गेले. तेव्हा, त्यांना त्यांच्या जमीनीमध्ये खोदकाम केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तत्काळ उत्तमनगर पोलिसांना खबर दिली.

विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. तेव्हा, त्यांच्या जमिनीत 400 फुट लांब, चार फुट रुंद व दोन फुट खोल चर केली असल्याचे आढळले. तसेच त्यांनी वहिवाटीसाठी गेलेला रस्ता उकरुन बंद केला आहे, याबरोबरच त्यांच्या जागेतील दगडाच्या ताली, लोखंडी तारेचे कुंपण, सिमेंट व लोखंडाच्या खांबांची तोडफोड केल्याचे आढळून आले. धनकुडे यांनी फिर्यादी यांची कुठलीही परवानगी न घेता, त्यांच्या जागेत घुसून चर खोदण्याचे काम केले आहे.