फडणविसांनी केली पवारांची पोलखोल; हिंदू दहशतवाद, काश्मीर फाईल्स, मुंबई बॉम्बस्फोट या मुद्यांवरून हल्लाबोल

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तर सभेतील आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही गुरूवारी एकापाठोपाठ 14 ट्विट करत पवारांवर निशाणा साधला आहे. कलम 370, हिंदू दहशतवाद, इशरत जहाँ, काश्मीर फाईल्स, मुंबई बॉम्बस्फोट आदी मुद्यांवरून फडणवीसांनी पवारांना लक्ष्य केलं आहे.

एका ट्विट थ्रेडच्या माध्यमातून फडणवीसांनी शरद पवार यांनी वेगवगेळ्या विषयांवर केलेलं भाष्य आणि त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत या सर्वांची बाबासाहेबांच्या विचाराशी सांगड घातलीय. एका ट्विटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम ३७० ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आज डॉ. आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम 370 ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर फडणवीस यांनी उपस्थित प्रश्नचिन्ह केले. यावेळी काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून अलिकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानांचाही समाचार घेतला. तसेच नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाचेही स्मरण करून दिले.

इशरत जहाँ ही निर्दोष होती, याबाबत पवारांनी केलेल्या विधानाचेही स्मरण करून देत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख करत राष्ट्रवादीला उघडे पाडले. 2012 मध्ये आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली आणि रझा अकादमीवर कारवाई केली नाही, याचाही उल्लेख त्यांनी केला असून संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला? अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, याही विधानाचे देखील स्मरण करून दिले. सोबतच ‘हिंदू टेरर’ हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, असे विचारत निशाणा साधला.

सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी केलेल्या मागणीचाही उल्लेख त्यांनी केला असून मुंबई बॉम्बस्फोटानंतर 13 वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत. काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून? काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही! असं त्यांनी म्हटले आहे.