IPL Playoff Scenario: पंजाबला हरवत दिल्लीने वाढवली चेन्नई आणि लखनऊची डोकेदुखी, ‘या’ दोन संघांना मात्र फायदा

IPL Playoff Scenario : आयपीएल २०२३च्या (IPL 2023) शर्यतीतून बाहेर झालेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने पंजाब किंग्जला पराभूत करत प्लेऑफची समीकरणे बदलून टाकली आहेत. धर्मशाला येथे पंजाब विरुद्ध दिल्ली (PBKSvsDC) संघात आयपीएल २०२३ मधील ६४वा सामना झाला. या सामन्यात दिल्लीने १५ धावांनी पंजाबचा धुव्वा उडवला. या पराभवामुळे पंजाबसाठी प्लेऑफची शर्यत कठीण झाली आहे.

पंजाबच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी प्लेऑफची शर्यत सोपी झाली आहे. आता या दोन्ही संघांना त्यांचे उर्वरित सामने जिंकायचे आहेत आणि यापैकी एक संघ प्लेऑफसाठी पात्र बनेल. गुजरात टायटन्सचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. आता चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांचा तिन्ही स्थानांसाठी सर्वात मजबूत दावा आहे. राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज हे संघही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत, मात्र हे संघ त्यांच्या नशिबावर अवलंबून अंतिम चारमध्ये स्थान मिळवू शकतील.