मोठी बातमी : कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; ‘हा’ मातब्बर नेता नवीन पक्ष काढण्याच्या तयारीत 

कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; 'हा' मातब्बर नेता नवीन पक्ष काढण्याच्या तयारीत 

जयपूर – राजस्थानमध्ये निवडणुकीच्या वातावरणात माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot)  आपल्या प्रादेशिक संघटनेची रूपरेषा अंतिम करत आहेत. 11 जून रोजी त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा होऊ शकते. पायलटच्या नव्या पक्षाचे नाव प्रोग्रेसिव्ह काँग्रेस असू शकते.

माध्यमांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे दिग्गज नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सातत्याने बंडाचा झेंडा फडकावत असलेले पायलट रविवारी (11 जून 2023) घोषणा करू शकतात. पायलट त्यांच्या प्रोग्रेसिव्ह काँग्रेसच्या प्रक्षेपणाच्या आधी औपचारिक तयारीमध्ये व्यस्त आहेत.

पक्षाच्या घोषणेपूर्वी सोमवारी राज्यसभा खासदार विवेक तनखा यांच्यासह पायलट सतना जिल्ह्यातील मैहर मंदिरात माँ शारदाचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. पायलटच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, माजी उपमुख्यमंत्री जयपूरमध्ये रॅली घेऊन घोषणा करण्याची शक्यता आहे.

पायलटच्या या निर्णयानंतर त्यांचे किती समर्थक आमदार काँग्रेसपासून वेगळे होतात याकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आणि या घडामोडीचा गेहलोत सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जुलै 2020 मध्ये सचिन पायलटने उघडपणे बंड केले. पायलट तेव्हा उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा केला होता. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्र्यांनी 2020 मध्ये किमान 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. प्रदीर्घ राजकीय गदारोळानंतर हे प्रकरण मिटले. अखेर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चतुराईने आपल्या सरकारला अडचणीतून वाचवले.