‘निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेणाऱ्या शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं’

मुंबई – राज्यसभेच्या राज्यातल्या 6 जागांसाठी आज मतदान होणार आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून इमाम प्रतापगढी तर भारतीय जनता पार्टीने पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीत उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या 41 मतांची गरज आहे. संख्याबळानुसार शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. तर विरोधी पक्ष भाजपाकडे 106 आमदार आहेत. त्यानुसार भाजपाचे दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

भाजपाला तिसऱ्या आणि शिवसेनेला दुसऱ्या जागेसाठी अपक्ष तसंच अन्य पक्षांच्या आमदारांच्या मतांची गरज आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्षानं महाविकास आघाडीला (MVA) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. यातच आता एमआयएमने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार असल्याचं जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. या मतांमुळे आमचा विजय निश्चित झाला असल्याचे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत.

दरम्यान, औरंगजेबाच्या थडग्यावर माथा टेकणाऱ्या नेत्याच्या पक्षाचा महाविकास आघाडीने पाठींबा घेतल्यानंतर आता मनसेचे नेते गजानन काळे (MNS leader Gajanan Kale) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते म्हणाले, राज्याची शोभा होईल अशी ही राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. त्या निजामाची अवलाद एमआयएमची (MIM) मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली,ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे.